जिल्हा परिषदेच्या शाळेत बस्करं घालून, एका लाईनीत बसून, सुरात " या वाऱ्याच्या बसुनी विमानी " गाणी म्हणनारे आम्ही मला अजूनही आठवतो. ते गाणं गातानाही एक वेगळीच नशा डोक्यात आणि मनात असायची कारण "विमान" हा माझा अत्यंत जवळचा विषय आहे. काही स्वप्नं आपल्याला पाहावी नाहीत लागत, ती जन्मतःच आपल्यासोबत असतात कदाचित, तसंच माझं लहानपणीपासून विमानात बसण्याचं आणि foreign ला जाण्याचं स्वप्न होतं. तेंव्हा foreign म्हणजे अमेरिका इतकंच माहिती होतं (पण अमेरिकेत वास्तव्य आणि करिअर हा स्वप्नाचा भाग नव्हता).
गावाकडे त्यावेळी सहसा विमानं दिसायची नाहीत. त्यामुळे कधी तरी आकाशात चमकणाऱ्या, चांदण्यासारख्या दिसणाऱ्या विमानाच्या lights सुद्धा नजरेआड होइस्तोपर्यंत पाहायचो. कधीकधी विमानांचे फक्त आवाज ऐकायला यायचे, गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक घालून , मान वर करून आकाशभर विमान शोधणारी मी मला अजूनही आठवते ☺️. नंतर मी प्रत्येक सुट्ट्यांमध्ये मावशीकडे मुंबईला जायचे आणि तिकडे airport जवळ असल्या कारणानी मला बाल्कनीतून खुपसारी विमानं पाहायला मिळायची. विमानांचे रंग, आकार, किती जवळून दिसली आणि अगदी दिवसभरात किती विमानं कोणत्या दिशेनं गेली सगळं माहिती असायचं. विमानातून प्रवास करायचा तर इंग्लिश बोलता आलं पाहिजे असा उगाच गैरसमज होता, खरं तर "तारे जमीन पर" मधल्या ईशान अवस्थी सारखी हालत होती माझी. मॅथ्स आणि इंग्लिश हे अत्यंत न आवडते विषय पण फक्त विमानाच्या प्रवासासाठी मी इंग्लिश speaking ला सुद्धा आपलंस केलं होतं (math's ची अजूनही बोंबच आहे). मधली बरीच वर्षं शिक्षणात गेली पण विमान प्रवास अजूनही अधूराच होता.

इंजिनीरिंग संपल्यानंतर साधारणतः ४ महिन्यांच्या कालावधीतच मी लग्न केलं आणि त्यानंतर ३ महिन्यांनी मी अमेरिकेला जाणार होते. पासपोर्ट आणि visa नसल्याने मी ३ महिन्यानंतर एकटीने प्रवास करणार होते. एकटीने जाणार असल्यामुळे सर्वांकडून शक्य तितके suggestions घेतले. दादा आणि माझ्या नवऱ्याने तर विमानाचं आतून बाहेरून वर्णन केलं होतं. Forms भरणे, खुर्चीचा बेल्ट लावण्यापासून, जेवण मागवणे, बोलणे अगदी टॉयलेट use करण्यापर्यंतच्या चर्चा झाल्या. घेऊन जायच्या सामानाची शॉपिंग, पॅकिंग सुद्धा झाली. जस जसे दिवस जवळ येऊ लागले तशी माझी आणि घरच्यांचीही काळजी वाढली. मित्र मैत्रिणींना call करून झाले, will miss you, call कर, contact मधे रहा, मुलगी देशसोडून चालली वगैरे बोलनी झाली आणि जायचा दिवस उजाडला.
२७ मार्च २०१३ ला रात्री माझी flight होती. रात्रीची जेवणं आटपून, ३ तास आधीच enter करण्याच्या हिशोबानी, रडण्याचा program उरकून आम्ही लवकरच निघालो. पप्पा आणि डॅड (सासरे) एरपोर्टच्या एंट्रन्सपर्यंत सोडण्यासाठी आले पण त्यानंतर माझा एकटीचा प्रवास सुरु झाला. एवढ्या भरलेल्या अंतःकरणांनी आम्ही तिघांनीही काही बोलल्याचं आठवत नाही मला पण नजरेनीच निरोप घेतला आणि प्रवास सुरु झाला.
luggage check-in करून मला security check साठी जायचं होतं. मागे वळून बऱ्याचदा पाहिलं पण आता नजरेला आपलं, जवळचं असं कोणी दिसत नव्हतं. त्यानंतर १-२ forms दादानी सांगितल्याप्रमाणे भरले. काही चुकलं नाही ना पाहण्यासाठी forms वरून परत एकदा नजर फिरवली पण भरलेल्या डोळ्यांमधून अक्षरंही अधुरी दिसू लागली. अर्थात पब्लिकमधे असल्याकारणाने अश्रूंनीही डोळ्यातून बाहेर येण्याची हिंमत नाही केली. पण चेहऱ्यावरचे हावभाव सावरून, सर्व formalities पूर्ण करून, तिकिटावर दिलेलं gate शोधलं. जड, बावरलेल्या मनाने मी gate जवळ जाऊन बसले. एक दोघांना विचारून बरोबर gate आहे ना ह्याची खात्री केली आणि पप्पाना gate जवळ पोह्चल्याच कळवलं.
इतक्यात काचेतून मला मोठ्ठ, गोल आकाराचं, पांढरं असं काहीतरी दिसलं. साधारणतः अर्धा एक मिनिटं मी शून्य नजरेनी त्या गोलाकडे पाहत होते. हळू हळू नजर आजूबाजूला जाऊ लागली आणि विमानासारखी आकृती नजरेस पडली. आत्तापर्यंत कळून चुकलं होतं कि ते विमान आहे आणि तो गोल विमानाचा पुढचा भाग होता. नंतरच्या ५ मिनिटांसाठी नजर स्थिर नसावी माझी कारण ते माझ्यासमोर असणार विमान माझ्या एका नजरेत मावत नव्हतं (इंटरनॅशनल flights त्यात मोठया असतात). माझ्या स्वप्नांमधल्या, कल्पनेतल्या आणि आकाशात उडणाऱ्या विमानापेक्षा प्रत्यक्षातलं विमान खूप मोठं होत.
आता flight ची वेळ झाली होती. माझा turn आल्यानंतर पासपोर्ट आणि तिकीट दाखवून मलाही आत एन्ट्री मिळाली. एंट्रन्समध्ये थांबलेल्या ऐरहोस्टसला Hi सांगून (आत्तापर्यंत Hi आणि Thank You ची चांगली practice झाली होती) पहिलं पाऊल विमानात ठेवलं .आपण घरात enter केल्याचाच feel आला पण आजूबाजूची माणसं सामान्य दिसतं नव्हती. International flight असल्यामुळे foreigners पण होते ज्यांना मी पहिल्यांदाच पाहत होते आणि आपण कोणत्यातरी दुसऱ्या planet वर आहोत असं वाटत होतं. तिकिटावर दिलेल्या सीटवर जाऊन मी बसले. नवऱ्यानी आवर्जून window सीटच बुक केली होती. मधलं एक सीट सोडून पलीकडे एक American बसला होता. थोड्याच वेळात announcements सुरु झाल्या. खूप प्रयत्न करूनही इंग्लिशमधून सर्व नाही समजल पण same announcements हिंदीमधून झाल्या तेव्हा बरं वाटलं. दादाने सांगितल्याप्रमाणे बेल्ट लावण्याचा प्रयत्न चालू होता पण थरथरत्या हातांनी तो काही माझ्याच्याने बसेना आणि शेजारी बसलेल्या अमेरिकेनला विचारायचा धीर होईना. पण माझी चाललेली धडपड कदाचित त्याच्या लक्षात आली असावी आणि त्याने स्वतःहूनच मला बेल्ट कसा लावायचा आणि काढायचा हे सांगितलं. त्याला thank you म्हणून मी एकदा दोनदा प्रॅक्टिस केली आणि एकदाचा belt बसवला.
आता विमान run way वरून संथ गतीने धावू लागलं. साधारणतः १० मिनिटांनी विमानाने यु turn घेतला आणि आता मात्र ते खूप वेगानी धावतंय हे जाणवलं आणि पोटात एक मोठा गोळा आला कारण flight ने take off केलं होतं आणि माझं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. अश्यापद्धतीने बेंगलोर ते Frankfurt जर्मनी आणि जर्मनी ते Boston Massachusetts असा २४ तासांचा विमानाचा प्रवास २२ व्या वर्षी पूर्ण झाला अर्थात flight change करण्याचा अनुभवसुद्धा मी पहिल्याच प्रवासात अनुभवला.
त्यानंतर बरेच छोटे मोठे प्रवास केले विमानातून. भारतातही दोनदा येणं झालं (२०१६,२०२०) पण आज वयाच्या ३० व्या वर्षीसुद्धा मी तितकीच उत्साहित असते विमान प्रवासासाठी. आजही जेंव्हापण विमानात बसते, एक दीर्घ श्वास घेऊन, डोळे मिटून, फ्रॉकमधल्या, आकाशात विमान शोधणाऱ्या मंजुची नक्की भेट घेते. डोळे जेंव्हाही उघडतात गच्च पाण्यानी भरलेले असतात, अर्थात "आनंदाश्रूंनी".
(माझी मुलगी वयाच्या ४ वर्षांपासूनच स्वतः बेल्ट लावते अर्थात ती त्या वातावरणात राहते आणि इंग्लिश तिची मातृभाषा असल्याने ती इंग्लिश speaking ऐवजी मराठी speaking च्या क्लासला जाते 🤦 आणि आता माझी ७ वर्षांची पिल्लूच मला इंग्लिश शिकवते ; मी U.S. ला गेल्यानंतर माझी आई २-३ आठवडे आजारी होती साहजिकच तिने मला इतक्या प्रेमाने जे वाढवल होत. खरच सर्वात मोठे दानशूर तर मुलींचे आई वडील असतात कारण "कन्यादान" करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असत; पहिला प्रवास Lufthansa Airlines नि केला होता आणि त्याची तिकिटं अजूनही जपून ठेवलीयेत मी.)
हा ब्लॉग मनापासून अजितला (नवरा) dedicate करतीये. कारण हे एकच काय अशी कितीतरी स्वप्न त्याच्या येण्यानी पूर्ण झालीयेत. Thank You !!!
मंजुश्री खटकाळे जाधव .
Comments
Post a Comment